बाबांचा जन्म मूळतापीचा.
घराजवळ चार
पावलांवर तापीतीराचे नयनरम्य सानिध्य ! आजोबांच्या अकाली निधनाने पाठोपाठची भावंडं
असणारं ते घर जणू उघडं पडलं.
आजोबा वारले तेव्हा बाबा जवळच्या गावी कामावर होते.
कुणीतरी बातमी दिली तेव्हा सैरभैर झाले आणि रेल्वे स्टेशनवर आले..खिशात पैसे
नाही..रस्ता माहित नाही..वाहतुकीची अन्य साधने नाहीत ..आता कसं? ही रेल्वे लाईन आपल्या गावी
नक्की जाते हा विश्वास पायातली शक्ती जागवायला पुरेसा ठरला. गाडीत न चढता
हातात एक काठी घेऊन रेल्वे लाईनच्या सोबतीने पदयात्रा सुरु !
अस्तव्यस्त कुटुंब सावरताना पुढे
परिस्थितीवशात पडेल ती कामं करत... जमेल तासा टेकू लावत आल्या दिवसांवर मात केली.
पण नशीब हुलकावणी देतच राहिलं. जीवन हा ऊन-सावल्यांचा लपंडाव असला तरी या एकूणच
खेळात ऊन्हाचीच साथ-सांगत अधिकांश टिकून राहिली. पुढील जीवनाच्या वाटा आणि वळणांवर
नियतीचा नाच म्हणजे फरफट, कुचंबणा, ससेहोलपट आदी शब्द आपली
यथार्थता निरंतर पटवीत राहिले. हे भुतावलोकनातून आजही प्रकर्षानं जाणवते .
तत्कालीन लहान गावात
मिळकतीची साधने तुटपुंजी ! पर्यायानं आर्थिक चणचण ही कायम
पाठराखीण होती. पण उमेदीच्या वयाची रग ,जोम, मानसिक उभारी आला दिवस पार
करून देत होती. पुढ्यातल्या स्थितीला हसण्यावारी नेत प्रसंगाचे एकूणच गांभीर्य
निष्प्रभ करण्याची शैली केंद्रस्थानी होती. जीवनचक्राच्या कुरकुरण्यावर विनोदाच्या
वंगणाने इलाज होत असे. अल्पसंतुष्टता
आणि ठेविले अनंते...वृत्तीने आर्थिक खिंडारांना लिंपून काढणे सहज अंगवळणी पडले.
बाबांचे घरगुती कामातील कसब
अचंबित करणारं होतं. एकामागून एक असा कामाचा फडशा फाडताना , "तू मला
सतत काम सांगू शकला नाहीस तर मी तुला खाऊन टाकील !" म्हणणाऱ्या त्या
गोष्टीतील जीन नामक राक्षसाची
आठवण झाल्याखेरीज राहत नाही. प्राप्त है वो पर्याप्त है. ही
धाटणीमुले चैनीची सुखसाधने आकर्षित करण्यास असमर्थ ठरली. वैयक्तिक आवड-निवडीला
नेहमी चार हात दूर राहून साधेपणाचे वैभव प्रस्थापित करण्याची सवय लागली.
"बाबा तुमची जन्मदिनांक काय ?"
"दहा एप्रिल एकोणविसशे तेवीस "
शक्यच नाही..... तुमच्या
कुंडली नुसार चार आक्टोबर येते. म्ह्णजे १०-४ नसून ते ४-१० आहे अशी दिवस महिन्याची
अदलाबदल झालीय !
आता काय त्याचं, मी जन्मभर तीच तारीख लिहित
आलोय, माझं
कुठे काय अडलं? अनेकांना केवळ रेकॉर्ड चुकीची झाल्याने जाणीवपूर्वक चुकीची लिहावी
लागते. फक्त कुंडलीसाठी खरी हवीय तर असू देत...मला कुंडलीशी काही देणे घेणे नाही.
मला काही फरक पडणार नाहीये . तू कशाला नसते उपद्व्याप करतोस?
मी काय बोलणार. इतक्या
उशिरा का होईना, खरी
तारीख कळली हे काय कमी आहे.
“बाबा, तुम्हाला आत्या होती
काय?”
“आत्या? म्हणजे वडिलांना
बहिण?? नाही...पण हा विचार तर माझ्या मनात सत्तर वर्षात कधीच आला नाही. तू इतका
विचार कशाला करतोस?
“बाबा तुमच्या वडिलांचे नाव
नरहरी...त्यांच्या वडिलांचे नाव काय?”
“राजाराम”
“त्यांचे वडील?”
“वामन”
“त्यांचे वडील?” बाबा
क्षणभर थबकले...मग हसून म्हणाले “बाजीप्रभू !” त्यांची विनोदबुद्धी अशी टवटवीत
होती. पण नंतर म्हणाले – तू विनाकाराण चौकशा आणि उठापटक कशाला करतोस?
बाबांच्या जानव्याला मी लहानपणापासून एक किल्ली लटकलेली बघत असे. एकदा विचारले काय आहे ते म्हणाले.... ही किल्ली आहे तिजोरीची !
तिजोरी कुठे आहे ?
माहित नाही !
तिजोरी नाही.. तर किल्ली कशाला हवीय ?
तिजोरी नाही हे तुला माहित आहे मला माहित आहे पण अनोळखी माणसाला माहित नाही.... तो आपल्याला श्रीमंत समजेल !
यात काय अर्थ आहे उगाच लटकन कशाला हवे ?
हे बघ तिजोरी असली तरी किल्ली नसेल तर त्या तिजोरीला काय अर्थ ? म्हणजे तिजोरी पेक्षा ही किल्ली महत्त्वाची ! आपल्याकडे तिजोरी नसली तरी किल्ली आहे ही मोठी गोष्ट आहे !
उगाच आपलं काहीतरी....... फुकट चोराचा गैरसमज व्हायचा ! फेकून द्या बघू ती किल्ली.....
नाही रे, आता तुला खरं सांगतो किल्लीच्या वजनाने जानवं सरळ राहते.... हा त्याचा फायदा आहे.
निवृत्ती पश्चात बाबांनी एक
नोकरी पत्करली. वेतन वगैरे ठरले नव्हते. पण महिना झाल्यावर जेव्हा त्याने
अपेक्षेपेक्षा तुटपुंजी रक्कम देऊ केली तेव्हा ती न स्वीकारता तडक नोकरी सोडून
निघून आले.
“नोकरी सोडायचीच होती तर
दिले ते घेऊन तरी यायचे....” आईच्या या म्हणण्यावर ते म्हणाले, ‘पण मला त्याच्या मयतीसाठी ते पैसे
द्यायचे असतील तर?”
प्रवास म्हणजे विकतचं दुखणं ...घरातल्या वस्तू म्हणजे फुकटचं गळ्यात
लोढणं का बांधायचं? या वृत्तीने काही जमवलं नाही हे खरं... पण आयुष्य किचकट नं
करता सरळसूत राखलं हेही खरंच ! पायजामा
आणि बंगाली-शर्ट या
साध्या ठराविक पोशाखात जगातील
कोणतीच स्थित्यंतरे परिवर्तन घडवून आणू शकली नाहीत. पोशाख दोनच....ठेवणीतली जोडी
हा दुर्लक्षित विचार होता. आहेत की दोन पायजामे .आणिक पुन्हा कशापायी
..एकावर एक घालणार की काय... कुणाच्या लग्नाला जायचय? असे
ठराविक डायलॉग ऐकावे
लागत. पण कपडे रविवारी स्वच्छ निळेततून
काढलेले असत. इतरांचेही मळकेपण जराही खपत नसे. या स्वभावामुळे एकदा त्यांनी शेजारचे
घरमालक नाटी मास्तरचे मळके धोतर त्यांच्या अनुपस्थितीत धुवून पुन्हा त्याचं जागेवर
ठेवून दिले. वारंवार लक्षात आणूनही ते मनावर घेत नव्हते...बाबांना मळकेपण खपत
नव्हते...परिणामी परिणामी ही सहजकृती केली
गेली. गोष्ट लहानशी पण आठवणींच्या गुंतावळीत अडकून राहिलेली..
बाबांचं वाचन फार नव्हतं. केवळ अवलोकन हाच अनुभव ! बांधा मजबूत आणि तब्येतीच्या तक्रारी फार नव्हत्या.... कोलेस्टेरोल, ट्रायग्लिसेराइड्स, लिपीट प्रोफाइल, विटामिन डिफिशियन्सी, हायपर टेन्शन, डायट कंट्रोल असे इंग्रजी शब्द त्यांचे तोंडून कधीच ऐकले नाहीत ! ते त्यांना माहीतच नव्हते आणि त्या वाचून त्यांचं कधी काही अडलं सुद्धा नाही ! पण तेव्हा ते आम्हाला त्यांचं अज्ञान वाटत असे.... पण त्यांची एकंदरीत जीवनशैली ही नैसर्गिक गरजांना साद देणारी होती.... आज सगळ्या शास्त्रांसह परिशिडन करून शेवटी आम्ही बाबांचीच शैली आत्मसात केली आहे.... भूक लागली की जेव्हा वेळ तहान लागली की पाणी प्यावे आणि झोप लागली की झोपावे... शरीर स्वतःच गरजेनुसार मागणी करते..... आपण फार विचार करण्याची गरज नसते !
मला कविमन हे आईकडून आणि
विनोदबुद्धी ही बाबांकडून मिळालीय. त्यांचे जीवन तत्वज्ञान कुठल्याही पुस्तकातून
आलेले नव्हते. स्वतःच्या चिंतनातून तर मुळीच आलेले नव्हते. जे होते ते अस्सल उपजत
होते. पर्यायाने त्याची फारशी जाणीव पण नव्हती. " नो-वरी कीट "
त्यांच्यात इनबिल्ट होती, असं
आम्ही गमतीनं म्हणत असू. तणावपूर्ण प्रसंग हसण्यावारी नेण्याची कला हे त्या कीट चे
प्रात्यक्षिक वरदान होते.
बाबांचे छंद जरा विचित्र
होते. ओळखीचं जाळे विणण्याचा छंद. थोड्याथोडक्या ओळखीतही कुणाच्याही घरी किंवा
त्याच्या कार्यालयात भेट देणे...त्या बोलण्यातून कुणा दुसऱ्याचा पत्ता
मिळाला की तेथे जावून पहिल्याची ओळख सांगायची....अश्शी गम्मत ! अनेक पेन जमा केले
होते पण ते जुने टाकावू असल्याने त्यांना एन्टीक मूल्य नव्हते पण फावल्या वेळात
एका पेनाला दुसर्याचे टोकर एकाची निभ आणि जीभ दुसऱ्याला जुळवत “ आता बघ
मस्तपैकी फौंटनपेन तय्यार ! असे तयार करून एखाद्या शाळेसमोर जावून पोरांना मी हे
पेन विकणार !”
“कुणीसुद्धा घेणार नाहीत..तुमचे ते फडतूस पेन ?”
“नाही घेतले तर मी फुकट
वाटील !”
बरच झालं हल्लीचा युज एंड
थ्रो पेन चा जमाना त्यांनी पाहिला नाही. तो प्रकार त्यांना अजिबात आवडला नसता. पेन
एकदा वापरून झाला की फेकून देणे म्हणजे काय?
घरगुती कामातील कसब
वाखाणण्याजोगं होतं. निवडणे, शिवणे, कपडे धुणे हे आवडते कामं. आताघरी
कधी जेव्हा
सुतळी, खिळे, नाडे, वाशर, छोट्या बाटल्या, दोरे, दाभण, पोकर, शर्टच्या बटन्स यांची गरज
भासते तेव्हातेव्हा बाबांच्या या वस्तूंच्या निगुतीनं केलेल्या कलेक्शनची
हमखास आठवण आल्याखेरीज राहत नाही. साबणाचे रेपर जमा करून ठेवायचे..बघ किती सुंदर
चित्र....वस्तू सोबत रेपर्चेही पैसे आपण मोजले असतात...तुम्हा लोकांना पैशाची
किंमतच नाही. आता यावर हसावे की राडावे ते कळेनासे होई.
बाबांना उधारीची सवय होती
आणि तेच त्यांच्या निरंतर गरिबीचं कारण होतं असं माझं ठाम मत आहे. त्यामागे ते अजब
तर्कट ऐकवीत. महिनाभर राजा सारखं राहावं
माणसांनी आणि एक तारखेला देणी देऊन कफल्लक वाटले तरी हरकत नाही. अयथा उलट
व्हायचं एक तारखेला राजा दानशूर कर्ण आणि महिनाभर विदुराच्या कण्या... माझ्यातील ऋण-द्वेषाचे कारण उधारीचे दाहक वास्तव हेच आहे. उधारी म्हणजे मजबुरी....नंतर आले तरी आधी नगदी वाल्यांची वास्तपुस्त...तोवर उधारी वाल्यांना उभे ठेवले जाते...निकृष्ट माल उधारीच्या माथी येतो. सगळा पगार उधारी पटविण्यात गेल्यावर पैशाविना होणारी कुचंबणा, कोंडमारा, जीवाची घालमेल आदीमुळे गरिबीचा अगदी जवळून अभ्यास झाला. "दारिद्र्य परमान्जानम" असं वचनाच आहे. " गरिबीत जन्म झालं असला तर माझा दोष नाही पण किमान गरिबीत मारणार नाही" असं कुठेतरी वाचलं होतं. या वाक्याचा मनावर खोलवर परिणाम झाला. नंतर तुटपुंजी मिळकत असली तरी कसंही करून स्वतःच्या घरासाठी बचतीचा आटोकाट प्रयत्न करणे...हेच काय ते हाती उरलं !
एकदा बाबांचा पगाराचा खिसा कापल्या गेला. ही घटना फार मोठी नसली तर गम्मत पुढे आहे. त्या दिवशी
आम्हा सर्वांना कळले की बाबांजवळ शिलकेत
एक पै नाही...कुठल्याही बँकेत खाते नाही.
“म्हणजे तुमचे बँकेत बचत
खाते नाहीच का?” कुणीतरी विचारले
“अख्खा पगार त्याच दिवशी
उधारी चुकवण्यात जातो तर खात्यात बचत कशी करणार?” असल्या या युक्तीवादावर फक्त आईचं समाधान होई. कारण तिनेही आर्थिक चणचणीचा मनाने
स्वीकार केला होता. पण मला मात्र त्यात धोरणीपणाचा अभाव दिसायचा.
आनंद भंडारची मिक्स मिठाई,
नंद भंडारची रबडी, पेढे, गुळ-पापडी, आंबे, डांगूर असे गोड पदार्थ फार आवडायचे.
बाबांना मधुमेह कधीच नव्हता. जो होता तो पॉपिन्स आणि पेढ्यांच्या अतिरेकी सेवनाचा उद्रेक
होता. खिशात रोज पेढ्यांचा पुडा, हे एक
लक्षणीय वैशिष्ट ! लोक म्हणत काही आनंदाचा प्रसंग झाला तर आपण पेढे आणतो..तुम्हाला
रोज इतका कोणता आनंद होतो?
रिस्टवाच आणि रेन-कोट या
मामुली वस्तूंचे जबर आकर्षण होते. पण त्यांनी या दोन गोष्टी कधीच विकत घेतल्या नाहीत.
बाबा घड्याळ का नाही तुमच्या हाताला? या प्रश्नावर ते म्हाणाले.,” अरे त्या
लक्ष्मी-नारायण कॉलेजवर इतकं मोठं LIT घड्याळ कशासाठी लावून ठेवलंय?”
काही लोकांच्या
सदसुखीपानांच रहस्य मला वाटतं त्यांच्या विस्मरणशीलतेला द्यावे लागेल. पण तो दोष
म्हणून नव्हे तर वरदान म्हणूया ! कारण अल्पावधीत डिलीट ऑल करून संपूर्ण पाटी कोरी
ठेवायची. परिणाम इ कधीकधी तीच चूक पुन्हापुन्हा नव्याने बिनदिक्कत करायची
सोय...घरी सामोसा केला की आकार बिघडतो हे
कळले पण तरी पुन्हा नव्या उत्साहाने सामोस्याचा घाट घालायचा. बाबा चिंता न करणे तुम्हाला
कसे जमते हो?
चिंता म्हणजे का? आता काय
खाली डोके आणि वर पाय करू? “चिंता से चतुराई घटे- दुख से घटे शरीर...पाप से
लक्ष्मी घटे – कह गये दास कबीर” हा कबीराचा दोहा तशीच वेळ येताच दर वेळी वर्षानुवर्षे
तसाच रिपीट करणार. हे इवलेसे तत्वज्ञान पुरेसे असते. उदा. अंघोळ मला आधी करू दे.
माझी चिमणीची अंघोळ आहे. तासभर नाही लागत. चिमणीची अंघोळ हा वाक्प्रचार असा काही फीट –फीड असतो की आपोआप तोंडावाटे पडतो.
एकदा मंदिरात बाबा काहीतरी
वाचत होते. मुळात चष्म्याची गरज नव्हती. पण तेथील एका अतिहुशार म्हाताऱ्याने
“चष्मा लगाके पढो” असं स्वानुभवाचा फुकट अनाहूत सल्ला दिला. त्यामुळे त्यांनी कुतूहलापोटी
चाळीशीचा चष्मा विकत घेतला. पण मुळात त्याची गरजच नसल्याने “मला बिना चष्म्यानीच
जास्त चांगलं दिसते !” असा निष्कर्ष काढला. ती एक पडीत वस्तू झाली. त्यामुळे
८७व्या वर्षीही ते चष्मा न लावता वृत्तपत्र वाचन करीत. कधी फोटो काढताना उगाच
शोभेची वस्तू म्हणून चष्मा लावून बसत.
त्यांच्या वयाच्या
मंडळींसोबत कधी विचारमंथन गप्पा करताना दिसत नसत. लहान मुलांसोबत विशेष रमायचे.
लहानंसोबत लहान होऊन वागताना आपले चालू वय विसरायला होत असावे. एकदा मनी रडत म्हणाली,
“आजोबांना पेपरमिंट फोडून मागितली तर मला लहान तुकडा दिला...मोठा स्वतः खाऊन
टाकला. नाही मी मोठा नाही घेतला असं म्हणताना अगदी लहान बालकासारखे दिसले.
आजोबा तुमचं नाव काय?
बाळकृष्ण..... पण आता प्रौढकृष्ण म्हणाला काही हरकत नाही
आजोबा
तुम्ही लहानपणी कसे होतात? छोट्या मनीच्या या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिलं ,”
गोरापान, गुटगुटीत फर्स्ट-क्लास !”
“बाबा तुम्हाला नोकरी
लागली, तेव्हा मुलाखत आणि निवड कशी झाली, ती गम्मत सांगा ना!”
“आम्ही ओळीने बसलो होतो. एकेकाला
आत सोडत होते. मि गेलो तेव्हा तेथे एक गोरा इंग्रज बसला होता. मला बघताच म्हाणाला –
tallman selected ! झाला...संपला इंटर-व्ह्यू !
बाबांनी चिंता कधी केली
नाही आणि ते दीर्घायुषी झाले. त्यांची चिंता अनेकांनी केली...पण ते आज जिवंत आहेत
काय? ते तर कधीचेच मेले हो...चिंतेने ! या चिंतामुक्ती वर बाबा मौलिक बौद्धिक ऐका
“होणा है सो होना है – फिर काहे का रोना है.. समोर आव्हान आल्यास फाईट, फ्राईट आणि
फ्लाईट यातील तिसरा मार्ग सोयीचा वाटे. समस्येकडे कानाडोळा करत अन्नुल्लेखाने
फुग्यातील हवाच्च काढून घेण्याचे दुर्मिळ कसब त्यांनी कमावलेले नव्हते तर ती दैवी देणगी होती. ही सुद्धा फुशारकीची बाब होऊ शकते हे ध्यानीमनी नसे. कोणत्याही
कामाला कमी न लेखता नेटकेपणा व अंगभूत हलकाईने कार्यरत राहून वैफल्याला कदापि जवळ
फटकू दिले नाही. परिणामी नैराश्याला आल्यापावली तोंड काळे करण्या उपर गत्यंतर नसे.
“मनुष्याला दोनच चिंता असू
शकतात...जेवल मिळाले पाहिजे आणि शौचास साफ
व्हायला हवी. म्हणजे आत जायला हवे ते आत गेले पाहिजे आणि बाहेर यायला हवे ते बाहेर
आले पाहिजे तेही योग्यवेळी मग इतके झाल्यावर कशाची चिंता उरते ? loading आणि
unloading ठीकठाक सुरु राहिलं तर दळणवळण म्हणजे ट्रकचा धंदा चांगला चाललाय असं
खुशाल समजायला हरकत नाही. खायला आणि औषधाला पेन्शन आहे...शंभरी गाठायला काय हरकत
आहे?
एक सर्वश्रुत कहाणी आहे.
झाडाखाली आराम करणाऱ्याला एक विद्वान सुनावतो. तुमच्यासारखे लोक आहेत म्हणून
देशाची प्रगती होत नाही. अरे काही काम कर...मग काय होईल? पैसे मिळतील...मग काय
होईल ..ते गुंतवून मोठं धंदा उभारशील ...मग काय होईल? शेवटी विद्वान म्हणतो मग तू
आरामात जगू शकशील. ते तर मी आत्ताच करतोय की ! सदर कथेतील ती आरामशीर व्यक्ती
म्हणजे बाबा असावेत...असं नेहमी वाटतं. असो हा झाला गमतीचा भाग.
स्वतःचे घर या विचाराला
आर्थिक स्थितीने कधीच उमेदीच्या दिवसात परवानगी दिली नाही. पण कुठे घरबांधणी सुरु
असल्या मुद्दाम थांबून ते दृश्य बघायला आवडे.
“बघ तो एव्हडा खर्च आणि
त्रास करून घर बांधतोय बिचारा...आपल्याला मोफत आयते बघायला काय जाते?”
“अहो, पण दुसऱ्यांचे घर
बघणे आणि स्वतःचे घर बांधणे यात फरक नाही
का?”
“तो काय घेवून जाणार आहे की
काय घर घर सोबत मेल्यावर ! घर ही निव्वळ तात्पुरती व्यवस्था असते रे !” अलौकिक
पातळीवर हे शब्द खरे उतरत असले तरी लौकिक समाधान करणारे नव्हते.
आमच्या लहानपणी घरापुढे एक
श्रीमंताचा बंगला होतां. त्यांचे ते लक्ष्मीपुत्र वारेमाप फटाके दिवाळीत फोडायचे.
ते बघून अस्मादिकांचे बालमन फाताक्यासाठी हट्ट करी. तेव्हा बाबा समजवायचे, “ अरे
त्यांना जेवढा फटाक्याचा आवाज मिळतोय ना तेवढाच आपल्यालाही मोफत मिळतोय...याउपर
त्यांना वात पेटवावी लागतेय...वात पेटवण्यात कोणता आनंद?
बाबांच्या बालसुलभ वयात
कधीतरी सायकल शिकताना टी थेट एका बांगडीवालीच्या दुकानात घुसली होती म्हणे...तिने
आकांडतांडव केलं ...अजोबा भडकले, “खबरदार, पुन्हा सायकलला हात लावशील तर !” या
ब्रम्हवाक्याचे कठोर पालन म्हणून उभ्या आयुष्यात कधीच सायकल किंवा तत्सम वाहन
चालवले नाही. कचेरीतून बरेचदा पायी येताना बघून
कुणी बसने येण्याचा सल्ला देताच म्हणायचे, “ पायी येण्याचा त्रास बघू
नका...आजवर बसचे किती पैसे वाचवले ते बघा!” पण हे गमतीने बोलण्यापुरते होते,
खिशातल्या पेपरमिंट गोळ्या मैलोनगणती पायपिटी साठी बळ देत राहिल्या...हे सत्य मागे
उरतंच !
कधीही बँकेत खाते न उघडणारा हा अपवादात्मक माणूस !” उधारीचा
अनुशेषच पुरा होत नाहीये – बँकेत काय डोमलं ठेवणार?” हा युक्तिवाद ! मासाराम्भीच
उधारीचे हप्ते भागवल्यावर मग काय...पुढे महिनाभर गरिबीचा जवळून अभ्यास करायला
मोकळे ! गरिबीची टिंगल उडवीत जगणे सोपे नाही. मला फर्निचर, सोफा-कम बेड घ्यायचाय
पण घरी जागाच नाही म्हणून राहिलाय..इथे नाकपुडीत हरिकीर्तन आणि आपणा चार पाव का
हाथी तीन पाव पे खडा है. अपनी धीमी गती कि गाडी है बस यु ही चलती राही तो इक दिन
मंझील पार कर लेंगे. जिस हालात राखे भगवान अलमस्त रहो भरपूर सदा –यातून जीवनदृष्टी
प्रकट होई. चैनीची सुखसाधने त्यांना आकर्षित करण्यास असमर्थ ठरली होती. फुटकळ
खर्चाच्या सुवाच्य नोंदी टिपून ठेवीत. पण जीवनाच्या मोठ्या अर्थश्स्त्राबाबत
कमालीचा बेहिशेबीपणा अंगात भिनला होता. रीत्भातीचे धोरण सैल असले तरी गुनिन्च्या
कौतुकासाठी शब्दात काटकसर कुचराई केली नाही.
आल्यागेल्यांच्या सहाणेवर
आपले दुःखाचे चंदन उगाळीत बसण्याचा फोलपणा आधीपासूनच उमगला होता. या जगतात
लौकिकार्थाने यशस्वी म्हणून गणण्यासाठी जे व्यवहार-चातुर्य असावे लागते त्याच्याशीच
कायम फारकत घेतल्याने “पत” वगैरे शब्दांशी जवळीक साधता आली नाही. एकसुरी
निरंतरतेने उन्नतीचा आलेख मांडण्याच्या
कामातून सुटका झाली होती एव्हढेच.
आयुष्यात संधीने दार
ठोठावले नाही हे खरे आहे ...तसेच यांनीही कधी संधीची वाट बघितली नाही हेही तितकेच
खरे आहे. कुठेतरी काद्माडून श्रेय लाटण्याशी त्यांचा दुरान्वयानेही संबंध नव्हता. नेहमी
शेवटच्या फळीतील रिकाम्या आसनावरील आपला हक्क अबाधित ठेवला होता. वखवखशून्य आयुष्य
हवे तर असेच समाधानाच्या खुंटीला घट्ट धरूण ठेवावे लागते बरं !
चिंतन केले नाही तशी
चिंताही केली नाही. आल्या दिवसाचे हसतमुखाने स्वागत केले. भूतकालीन
सिंहावालोकानाची गरज भासली नाही तसे भविष्याचे नियोजनही साधले नाही. असे सदा
वर्तमानात राहणे एकाअर्थी अव्यक्त ईश्वरशरणताच नव्हे काय?
मी मेट्रिकला असताना ट्युशन
लावायचं म्हणालो. पण बाबा नेहमीप्रमाणे म्हणाले काही नको पैसे नाहीत !
नंतर थोड्या वेळाने मला
बोलावून म्हणाले, “ तू जा ट्युशनला- मी देईन पैसे !” या दरम्यान त्यांनी काहीच
विचार केलं नसेल असं कसं म्हणता येईल?
एव्हडे मात्र खरे की उच्चभ्रू
आढ्यतेच्या प्रथितयश वलयापासून ते सुरक्षित अंतर राखून होते. जवळीक होती ती
निर्व्याज हलक्या-फुलक्या गप्पा छाटणाऱ्या साध्या-सुध्या जीवन्यात्रीशी...लहान
बालकांशी ! क्रोध नाकावर नव्हता..उशिरा येत असे आणि लवकर मावळत असे. पाच
मिनिटाच्या राग...नंतर त्याचा मागमूस उरत नसे.
आजारपण म्हणाल तर औषधालाही
नव्हते. एकदा माझं डोकं दुखत होतं .बाबा साधेपणाने बोलून जायचे म्हणाले “असं कसं
डोकं दुखते? आमचं तर कधी दुखत नाही..जेवण
झालं...झोप झाली..शौचास झाली आल तब्येत बिघडायला काय झालं?”
“तुमचे डोके दुखेल तेव्हा
समजेल !” असं मी वैतागाने म्हणे. पण दैवी योजना अशी तशी वेळ आलीच नाही त्यांचे
डोके कधी दुखलेच नाही. बाह्य संसर्ग, तणाव यामुळे अस्वस्थता येऊ शकते हे त्यांच्या
गावीही नव्हते. मला अर्धशिशीचा त्रास म्हणून गालिबच्या भाषेत जरा फेरबदल करून
म्हाणावेसे वाटते.... इस तबियतने मुझे निकम्मा कर दिया...वरना हम भी आदमी थे काम
के....असो.
एकदा सकाळपासून बाबा
अस्वस्थ दिसले. जीव बेचैन आणि चेहरा घाबरा-घुबरा झाला. मी ऑफिसमध्ये होतो. त्यांनी
मला बोलावून घेतले. “येये माझ्याजवळ बस..माझी तब्येत बरी नाही” ” क्षीण आणि हळू
आवाजात बोलू लागले. मी अधिकच गंभीर होऊन ऐकू लागलो.
“तू मोठा मुलगा आहेस म्हणून
तुझा अधिकार वेगळा...” मला भलामोठा पोरवडा असलेले पिताश्री आठवले.
“मी आता जातोय..सगळं
सुखासुखी व्हावं...माझ्या जवळ काही संपत्ती नाही...” बाबा आढ्याकडे बघत बोलत होते.
संपत्ती नाही हे एखाद्याने संपत्तीचं गुपित उघड करावं तसं त्यांनी
सांगितलं...याचं मला त्याहीवेळी हसू आलं.
काय होतंय ते तरी सांगाल की
नाही?
‘आज सकाळी खुलाशेवार शौचास
झाली नाही !” मी कपाळावर हात मारून घेतला. त्यानंतर बाबा चक्क तीस वर्षे जगले.
नोकरीत कधी कटकट वाटली तर,
डॉयलॉग ठरलेला, “या हाजीहाजीपेक्षा आता ठोक मार्केट मध्ये कांदे बटाटे पोत्याने
घ्यायचे आणि तेथेच चिल्लर विक्रीला बसायचं. संध्याकाळी खुर्दा घेऊन घरी...अर्थात
हे कुणाचे तरी ऐकीव बोल होते...जे प्रत्यक्षात उतरवण्यचा वकूब यांच्यात जराही
नव्हता.
जेवणातही आवडनिवड कोसो
दूर...पोटात भूक असली की सगळं आवडतं हा खाक्या. आंब्याचा रस हा दुर्बलबिंदू आय मीन
विक-पोइंट...मग सुरु होई अतिरंजित कथा... टाकीभर आंब्याचा रस करण्याची गोष्ट नेहमी
सांगत.आमच्याकडे आमराई होती. आंब्याचा माच आटाळ्यावर असे मी तेथे जाऊन मनसोक्त
आंबे खायचा. एका मोठ्या टाकीत आंब्याचा रस मी करायचा..खावून उरलेल्या रसाच्या
टाकीत आम्ही पोहत असू..” आदी अतिशयोक्त वर्णने बहु ऐकली आहेत.
कोऱ्या करकरीत नोटेचे विशेष
आकर्षण ! इतके की वीस रुपयाच्या मळकट नोटेच्या बदल्यात दहाची नवी नोट सहर्ष
स्वीकारतील ! जुनी नोट चालवत नाही तोवर जीवाला चैन नसे !
फावल्या वेळात जुन्या
कापडाच्या चिंध्या जोडून गोधडी शिवण्याचा एक छंद होता. सातत्याने ते काम करताना
बघुन्मी एकदा उद्वेगाने म्हणालो, “ उगाच चिंध्या सावडत बसता....फेका त्या चिंध्या
!”
बाबा उतरले, “ मी चिंध्या
सावडतो...तू कागदाचे चिठोरे सावडतो ...तुझे चिठोरे फेकले तर कसं वाटेल तुला?” या
प्रतिप्रश्नावर मी निरुत्तर झालो....त्याहून अधिक अंतर्मुखही !! खरंच माझ्या
चीठोऱ्याना त्यांच्या लेखी चिंध्या पेक्षा जास्त अर्थ नव्हताच !!
वेळेशी काय खायचे हा प्रश्न
कधी सतावला नाही. हालचालीवर निर्बंध आले होते तरी खिडकीतून रस्त्यावरच्या जाणाऱ्या-येणाऱ्या गाड्या मोजणे
सुरु असायचे. इकडून २५ गाड्या गेल्या की मी जेवायला बसतो. सांगा तणाव कसा बरं
येणार? फक्त पोझीटीव बघून सुखी व्हावं...तुम्ही निगेटिव बघून दुःखी का होता? हा
त्यांचा रोकडा सवाल? भाजप निवडून आली तेव्हा म्हणाले,” आता अडवानी पंतप्रधान
होणार” पण ते झाले नाहीत म्हणून धक्का बसण्याचे कारण नाही.” कदाचित १ वर्षासाठी
नंतर करतील त्यांना कारण आता त्याचाच तर नंबर आहे !” अशी स्वानुकुल समजूत करून सुखी
होत असत.
घरी टीव्ही येणे ही एक
क्रांतिकारी घटना...वाटलं बाबांना खूप आनंद होईल. टीव्हीचे आगमन झाले तेव्हा बाबा
जेवत होते. त्यांना सांगितलं तर, “ मी
आत्ताच जेवायला बसलोय...कशाची घाई आहे?” मी अशावेळी जेवण सोडून उठलो असतो. पण जेवताना
मध्येच कसे उठणार? ते शांतपणे जेवण आटोपून, चुळा भरून हात धुवून, पंचाला पुसत
आरामात आले.
“बाबा, तुम्हाला आनंद
नाही..उत्साह नाही?”
“तू एक टी.व्ही. गळ्यात
बांधून घे !”
नंतर एकदा म्हणाले, तुला
इतकी माहिती काढावी लागते, पैसे मोजावे लागतात, देखभाल काळजी करावी लागते. मला
मात्र आरामात बसून सर्व बघायला मिळते. हा हा हा आधी आजची बातमी उद्या पेपरला यायची...आता आजची
बातमी थोड्याच वेळात प्रत्यक्ष चालत्या-बोलत्या फोटोसकट बघायला मिळते..जगातल्या
घडामोडी घरबसल्या बघायला मिळतात तर कशाला बाहेर भटकायचे. ही जाणीव थक्क करणारी
होती. हल्ली कमरेत वाक आल्याने वाकरशी दोस्ती डेली होती. हिंद्न्यावर मर्यादा आली
तरी खिडकीतून जग बघता येतं हे समाधान पुरेसं होतं.
विंचवाच्या बिऱ्हाडा
प्रमाणे किरायाची घरे बदलावी लागत. एका रिक्षात भांड्याचे पोते..वरून दोन पलंग
लावले की सामन शिफ्ट ! पंप्रत्येक घरात दरवाज्याच्या मागे एक काठी असायची. आम्ही
तिला गुढीची काठी म्हणायचो. बाबा सांगत ती गुढीची काठी गुढीपाडव्याला एक दिवस पण
बाकी दिवस ती आपले रक्षण करते. रात्री कुणी दरोडेखोर आले तर अ आपल्या जवळ काही हवे
की नाही?
“पण बाबा, दरोडेखोर आपल्या
घरी यायला मूर्ख आहेत की काय?” यावर ते काही बोलले नाही पण त्या काठीमुळे आपण
बिनघोर झोपू शकतो यावर त्यांचां ठाम विश्व्वास होता.
कधी कुणी कारमधून घरापर्यंत
सोडून दिलं तर तेवढं सुख स्वतःच्या
भाग्याचा गर्व करायला पुरेसं ठरायचं. दुःखाची गोळी गिळून टाकायची असते आणि सुखाची
गोळी ही चघळायची असते. दुःखाला दाबून लहान करून टाकायचं आणि सुखाच्या फुग्यात हवा
भरून त्याला मोठं करायचं.
“बाबा, कृतार्थता वाटेल अशी
कोणती गोष्ट तुम्हाला वाटते?”
“माणूस रिटायर्ड होतो
त्यादिवशी ज्याची तब्येत उत्तम तो जिंकला....मी तर जेव्हडी वर्षे सर्विस केली
त्याहून अधिक वर्षे पेन्शन घेतली...हे आयुष्यातले सर्वात मोठे सुख !”
१ तारीख आली की सकाळपासून
पेन्शनची लगबग...दाढी करून गोगल लावून तय्यार ! यावर स्पष्टीकरण देताना
सांगत...दाढी वाढली असेल तर उगाच तब्येतीची विचारपूस करतात. त्यांना एकदा एकाने
विचारले, “क्या तुम्हे मौत से डर नाही
लगता?”
“बिलकुल नही...मगर इक दिन
जाना रे भाई....तबतक जियो जी भरके !”
“तुम्हाला डायबेटीस आहे
का?”
“कोण म्हणताय...अजिबात नाही
डायबेटीस होगा मेरी दुष्मनको ...काही लोक जेवण करण्याच्या ऐवजी चिंता करतात म्हणू
त्यांना व्याधी जडतात. डायबेटीस म्हणूस इतके जेवणाचे नियम पाळतात की त्यांचे
पोषणाच होत नाही...मग मरणाची तयारी होते !”
देवाशी संबंध त्रोटकच ...नमस्कारा
पुरता...चमत्कारासाठी नव्हे....त्यामुळे देवाकडे मागणे नव्हते...अपेक्षा
नव्हत्या..नशीब या पारंपारिक संकल्पनेला छेद देऊन प्राप्त जीवन संघर्षाशी त्यांचा
उभा दावा होता. आरामाशी मात्र अकारण शत्रुता बाळगली होती. परमार्थ फारसा वाचला
नाही. पण परमार्थ जगले तेही नकळत ! निचंतपणा बघून इतरांना हेवा वाटावा. जो ज्ञानी
योग्यानाही चिंतेला बगल देणे प्रयत्नांती साधत नाही. कुणाकडून अपेक्षा नाही तशी
कुणाविरुद्ध तक्रार नाही. नियातीच्या अस्तित्वाची जाणीवच नव्हती...मग नियातील्ला
क्रूर वगैरे म्हणणे दूरच ! दैवाच्या दिरंगाईळा सहनशीलतेने प्रत्युत्तर देत
जीवननौका पार करून नेली. व्यवहारातील चलनी नाणे कोणते याची कधी पत्रास बाळगली
नाही. व्युहरचना खटपट लटपट मानवत नव्हती. तदनुषंगाने प्राप्त पिछ्डीची मुर्वत
बाळगली नाही. अभिनय आणि की अभिनिवेश नाही...म्हणूनच कदाचित मातीत मळणाऱ्या या
जन्माची खंतही उरात उरली नव्हती. बाबांचे अस्थी-विसर्जन त्यांच्या जन्मगावी
मुल्ताईला झाले. तेव्हा अस्थिकलश घेऊन गाडी करून मुल्ताई कडे जाताना बाबांची
आठवण झाली. जिवंतपणी का कधी गाडी करून मुल्ताईला
त्यांना घेऊन जाणे सुचले नाही....?
असो. दीर्घायुष्य पार
पडले...कापुरासारखे जगणे झाले...शेष काही न उरले...उरले केवळ खुमासदार किस्से !
